Thursday, October 28, 2010

चित्र्यांचा एक मजकूर

(भाऊंबद्दल चित्र्यांनी खूप वेळा खूप ठिकाणी खूप काही लिहिलंय. इथे जो मजकूर प्रसिद्ध होतोय तो चित्र्यांच्या खाजगी संग्रहातला विजया चित्र्यांनी दिलेला- कुठेच छापून वगैरे न आलेला.)


 मुंबई: पठ्ठे बापूरावांपासून थेट नामदेव ढसाळांपर्यंत, मर्ढेकरांपासून थेट विवेक मोहन राजापुरेपर्यंत, नारायण सुर्व्यांपासून थेट प्रकाश जाधवांपर्यंत मराठीत तिचा वाङ्मयीन व्याप आहे. पण ह्या वाङ्मयीन मुंबईच्या थेट केंद्रापाशी एकच मराठी कथा-कादंबरीकार उभा आहे, तो म्हणजे भाऊ पाध्ये. मराठी संस्कृतीतलं हे मूळ महानगर त्याच्या सर्व सामाजिक गतिमत्तेसकट आणि नीतिमत्तेसकट भाऊंच्या विश्वात साकार झालंय. मार्क्वेझ, कुंदेरा, रश्दी यांसारखे अनेक लेखक गेल्या दहा-वीस वर्षांत जगभर गाजले. भाऊ ह्या लेखकांच्या इयत्तेचे, वैश्विक महत्त्वाचे लेखक आहेत. पण मराठीतही त्यांना पुरेसं ओळखलं गेलेलं नाही. मराठी साहित्या संस्कृतीच्या कोतेपणाचीच ही खूण आहे. आणखी दहा-वीस वर्षांनी भाऊंच्या कर्तबगारीची ओळख सर्वांनाच पटेल, अशी मला खात्री आहे.
मराठीतच नव्हे, जगात कोठेही, महानगरीय माणसाचं जीवन अस्तित्व आणि अनस्तित्वाच्या हिंसक आणि विक्राळ सीमेवरल्या अतिवास्तवसदृश वास्तवात जगलं जातं. त्याच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या घटनांमध्ये अमानुष हिंसेचा ओघ प्रकटत रहातो. संपूर्णपणे मानवनिर्मित जगात, जिथे नियती हे मानवी समाजाच्याच सामूहिक आत्माक्रमणाचं फळ आहे, माणसं एक चमत्कारिक जीवन जगत असतात. त्यांनी सामूहिकरित्या दडपलेला निसर्ग आणि त्यांनी स्वीकार केलेली जीवनशैली यांच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक जीवनाची तारेवरली कसरत चालू असते. भाऊ पाध्यांच्या कथा-कादंब-यांच्या विश्वात ही कसरत आणि तिच्यातल्या दारुण विसंगती प्रकट झाल्या आहेत. नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही.
***
हा मजकूर लिहिला गेला त्याला बुडाला बाजार दहा-वीस वर्षं तरी नक्कीच झाली असतील.
***

No comments:

Post a Comment